विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं सरप्राईज पॅकेज, बच्चू कडूंना शिवसेनेत आणून मोठ्ठं राजकीय गणित साधणार, शिवसेनेची ताकद कैकपटीने वाढणार
अमरावतीः- राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेतील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातही नसलेल्या बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. एकनाथ शिंदेंकडून तसा प्रस्ताव बच्चू कडू यांना देण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेतील अनेक नेत्यांचा याला विरोध आहे.
बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी द्यायचीच असेल तर त्यांना त्यांची प्रहार जनशक्तीसंघटना शिवसेनेत विलीन करायला सांगावी, असा शिंदेंच्या सेनेतील नेत्यांचा आग्रह आहे. तसे घडल्यास एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांची विदर्भात त्यासोबतच राज्यभरात विविध ठिकाणी असलेली पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची ताकद लक्षणीय आहे. दिव्यांग, शेतकरी, मजूर यासारख्या घटकांपर्यंत पोहोचलेला नेता आणि विशेष म्हणजे विदर्भात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी बच्चू कडू यांचा विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती आहे. बच्चू कडू प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करुन एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर शिवसेनेची विदर्भातील ताकद वाढेल. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे यापूर्वी दोन आमदार निवडून आले आहेत.
त्यामुळे विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात प्रहार संघटनेचे जाळे आणि बच्चू कडू यांची वैयक्तिक ताकद लक्षणीय आहे. परिणामी बच्चू कडू शिवसेनेत आले तर शिवसेनेतील ताकद वाढू शकते. विदर्भात शिवसेनेची स्वत:ची अशी फारशी ताकद नाही. विदर्भात सध्याच्या घडीला भाजप आणि काँग्रेसचा दबदबा आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासारखा नेता शिवसेनेत आला तर विदर्भ आणि अमरावती पट्ट्यात शिवसेनेची ताकद वाढेल. याशिवाय, बच्चू कडू यांची सामान्यांचे प्रश्न घेऊन लढण्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची राजकारणाची पद्धत ही एकनाथ शिंदे यांच्याशी मिळतीजुळती आहे. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता बच्चू कडू हे शिवसेनेसाठी सर्वदृष्टीने लाभदायक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.









