तुमसरात पाणी पेटलं! नगराध्यक्षांच्या खुर्चीवर “हार’ आणि “मडकं’
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- एकीकडे ‘हर घर नल, हर घर जल’च्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे ४७ कोटी रुपये खचर्ूनही जनतेला तहानलेलं ठेवायचं, हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आज चव्हाट्यावर आला. प्रभाग क्रमांक ३ मधील पाणी टंचाईने संतप्त झालेल्या महिलांनी आज नगरसेविका रोशनी विवेक भोंडेकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर असा काही ‘घागर मोर्चा’ काढला की, प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. नगराध्यक्ष खुर्चीत नसल्याचे पाहून संतापलेल्या महिलांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून आणि त्यावर मटके ठेवून नगराध्यक्षांचा जिवंतपणी ‘तेरवा’च साजराकेला! तुमसरकरांची तहान भागवण्यासाठी सुवर्ण जयंती पाणीपुरवठा योजनेतून ४७कोटींचा चुराडा करण्यात आला.
शहरात नवीन पाईपलाईनचे जाळे तर विणले, पण नळाला पाणी मात्र बेपत्ता आहे. प्रभाग ३ आणि बोरी रोड परिसरातील नागरिक थेंबभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. विशेष म्हणजे, या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत रोशनी भोंडेकर यांनी थेट पालकमंत्र्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी लावून धरली आहे. मात्र, प्रशासनाला अद्याप पाझर फुटलेला नाही. कडाक्याच्या उन्हात पायपीट करत जेव्हा हा मोर्चा पालिकेत धडकला, तेव्हा नगराध्यक्ष सागर गभणे दालनातून गायब होते. यामुळे महिलांच्या संतापाचा कडेलोट झाला. “जनतातहानलेली असताना नगराध्यक्ष कुठे लपलेत?’ असा सवाल करत महिलांनी थेट त्यांच्या दालनात घुसून घोषणाबाजी केली. नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीवर हार आणि रिकामी घागर ठेवून महिलांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. हा प्रकार पाहून उपस्थित कर्मचारी अवाक झाले होते.









