“त्या’ महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला तिची हत्या केल्याचा संशय
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या त्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू या प्रकरणाने आता उलटी कलाटणी मारली आहे. वाघाच्या हल्ल्याचा बनाव करुन हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जमिनीवरील “त्या’ रक्ताची तपासाची चक्रे आता वेगाने फिरविली जात असून या प्रकरणाने धनेगांव व परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या धनेगाव जंगल परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली असून, वनविभाग आणि पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन ठरले आहे. शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय साधना सीताराम उईके या महीलेचा मृतदेह जंगलात आढळला होता. सुरुवातीला हा प्रकार हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा असल्याचे वाटत असले तरी, आता शवविच्छेदनाचा अहवाल आणि घटना स्थळावरील परिस्थिती पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हा हत्तेचा कट असल्याचे सांगितले जात आहे.
वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्याचा केवळ बनाव रचला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर वाघाने किंवा बिबट्याने हल्ला केला असता, तर मृताच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी खोलवर जखमांच्या खुणा असायला हव्या होत्या. मात्र या प्रकरणात मृताच्या गळ्यावर केवळ एका बाजूला २ इंच लांब धारदार जखम आढळून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळले, तिथून सुमारे २.८ किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला. सामान्यतः वन्यप्राणी शिकार ओढत नेत असताना जमिनीवर ओढल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. मात्र येथे जमिनीचा पृष्ठभाग असामान्यरीत्या सपाट करण्यात आल्याचे दिसून आले.
यामुळे मृतदेह एखाद्या पोतडीत भरून तिथे नेऊन टाकलाअसावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, मृतदेह १५ फूट खोल दरीत शिकार घेऊन जात नाहीत. मृताच्या शरीरावर खांद्यापासून कंबरेपर्यंत घासल्याच्या खुणा आहेत. परंतु पायांवर किंवा टाचांवर कोणत्याही जखमा नाहीत. जे अत्यंत संशयास्पद आहे. या सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे वनविभागाने आता आपल्या तपासाची चक्रे घातपाताच्या दिशेने वळवीली असून, पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त चौकशी नंतरच या मृत्यू प्रकरणाचा खरा उलगडा होणार आहे. वाघ असो किंवा बिबट शिकारीला १५ फूट खंदकात फेकत नाही. जवळपास एखाद्या दाट झुडपात लपवून ठेवतो हे येथे उल्लेखित आहे. तपास चक्राच्या गतीवरुन त्या बाईची हत्या करण्यात आली. हे नाकारता येत नाही.









