विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, १० उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
मुंबईः- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. १२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. तर १२ मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूकसुद्धा १२ मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत होता. दरम्यान, ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेचपोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.









