जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. बैठकीत सन २०२५-२६ या वर्षातील मार्च अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मार्च २०२६ अखेरपर्यंतच्या खर्चाचा प्रगती अहवाल उद्दिष्टे व साध्यांसह महालेखापाल कार्यालयाशी ताळमेळ घालून तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ साठी मंजूर निधीबाबत संबंधित यंत्रणांना कळिवण्यात आले असून, प्रस्तावित कामांची यादी ३० एप्रिल २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर यादीस आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. तसेच, जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामांची गुणवत्ता उच्च दर्जाची राखण्याचे निर्देशही देण्यात आले. नवीन कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करताना सविस्तर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आदेश, संबंधित योजनेत समावेश असल्याचे प्रमाणपत्र, दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक प्रमाणपत्र तसेच कामाच्या सद्यस्थितीचे जिओटॅग फोटो सादर करणे बंधनकारक राहील. असे स्पष्ट करण्यात आले. अर्थसंकल्पीय अंदाज प्रस्ताव तयार करताना विभागांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगिड्डे यांनी केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.









