धार्मिक स्थळांवरील कराविरोधात काँग्रेसचे आक्रमक पाऊल

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- मोहाडी नगर पंचायत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळांवर लावण्यात येणाऱ्या मालमत्ता कर व इतर करांविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट करमाफीची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. मोहाडी शहरातील मंदिरे, मशिदी, चर्च, बौद्ध विहार, दर्गे तसेच विविध धार्मिक स्थळे ही पूर्णपणे सार्वजनिक स्वरूपाची असून ती केवळ धार्मिक व सामाजिक कार्यासाठी वापरली जातात.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक नफा मिळिवण्याचा हेतू नसताना त्यांच्यावर कर आकारला जाणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यातआले आहे. नगर पंचायतमार्फत आकारण्यात येणाऱ्या करामुळे संबंधित देवस्थान समित्या व व्यवस्थापनावर आर्थिक ताण निर्माण होत असून, शासनाच्या नियमांनुसार धार्मिक स्थळांना कर सवलत देण्याची तरतूद असताना ही वसुली सुरू ठेवणे योग्य नसल्याची भूमिका मांडण्यात आली. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष विजय शहारे, युवक शहराध्यक्ष अरविंद मनगटे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अस्पाक सय्यद, पर्यावरण सेल शहराध्यक्ष रवी थोटे, गोपाल निमजे, सेवाराम डेकाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भंडारा यांनाही निवेदनाची प्रत सादर केली आहे. दरम्यान, धार्मिक स्थळांवरील करमाफीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *