एकोडी क्षेत्रात रब्बी धान पिकासाठी अखंडीत वीज पुरवठा करा
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील एकोडी परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिकासाठी अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालय, एकोडी येथील कार्यकारी अभियंत्यांना अतुल भैसारे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले की, सध्या धान पिकासाठी वीजपुरवठा अपुरा व अनियमित मिळत असून, वारंवार लोडशेडिंग करण्यात येत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत व उत्पादनावरपरिणाम होत आहे.
यामुळे तात्काळ लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.निवेदनात नमूद केलेल्या समस्या लवकर न सोडवल्यास तीव्र शेतकरी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या वेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते व त्यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या करूनआपली मागणी नोंदवली.
कनिष्ठ अभियंता यांनी शेतकऱ्यांना आपल्या वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांचेशी बैठक करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना एकोडीचे सरपंच संजय खोब्रागडे, संजय समरीत, चांदोरीचे सरपंच विठ्ठल मसराम, एकोडी ग्रामपंचायतचे सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड तसेच शेतकरी कार्तिक मेश्राम, योगराज भुरे, संदिप मेश्राम, राकेश काळसर्पे, दिलीप कापगते, अशोक भुरे अध्यक्ष त.मु.स, संजय कापगते, संदिप भुरे, चंद्रशेखर कापगते, दीपक कापगते आदी उपस्थित होते.









