धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी लवकरच बैठक – महसूल मंत्री बावनकुळे

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर येथील पहिल्या शासकीय हरित (ग्रीन बिल्डिंग) इमारतीचे लोकार्पण आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमास खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आ. परिणय फुके, आ. नाना पटोले, माजी आमदार बाळा काशीवार, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, नगराध्यक्ष विनोद ठाकरे, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, तहसीलदार वैभव पवार, भाजप जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मध्यवर्ती इमारतीचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मत महसूल मंत्रीबावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ६० टक्के धान खरेदी अद्याप शिल्लक असून, धान खरेदीची मर्यादा वाढविण्याबाबत लवकरच केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लाखांदूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती साध्य होईल, व प्रवास अधिक सुलभ होईल, असे सांगून जमीन अधिग्रहण प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज अभियानाद्वारे प्रशासन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

“सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी अतिरिक्त ५ हजार घरांना मंजुरी मिळिवण्यासाठी प्रयत्न करण्यातयेणार असल्याचे महसूल मंत्री म्हणाले. तसेच “पंतप्रधान सूर्य घर’ योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. लाखांदूर येथे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव सकारात्मक असून, त्यास लवकरच गती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील अवैध तस्करी, गोवंश तस्करी व इतर बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मादक पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवून त्यांचे नियंत्रण पोलीस विभागाने करावे अश्या सूचना त्यांनी पोलिस अधीक्षक यांना दिल्यात.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा धावता आढावा मांडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका उभारणे हे शासनाचे ध्येय असून, लाखांदूर येथे अभ्यासिकेचे उद्घाटन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी नमूदकेले. जिल्हा नियोजन विभागाच्या विकास निधीत वाढ करण्यात आली असून “बळीराजा पाणंद रस्ता अभियान’ अंतर्गत शेतकऱ्यांना शेत रस्ते उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. नाना पटोले यांनी इमारतीच्या लोकार्पणाबद्दल आभार व्यक्त करून १०० खाटांच्या रुग्णालयाची मागणी केली. आ. परिणय फुके यांनी महसूल विभागाच्या गतिमान व पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे प्रशासन हे लोकांपर्यंत पोहचत असल्याचे सांगितले. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी धान खरेदी मर्यादा वाढवावी, आदिवासी समाजासाठी सांस्कृतिक भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मागण्या मांडल्या. यास देखील महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *