काँग्रेसची निर्णायक बैठक; २३ एप्रिलपासून तालुकास्तरावर आंदोलनाची हाक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध सामाजिक घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करून येत्या २३ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

या प्रस्तावित आंदोलनामध्ये शेतकरी, मजूर, विद्यार्थी व महिला यांच्या विविध मागण्यांचा समावेश असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

बैठकीत खा. डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी खासदार शिशुपाल पटले, जि. प. अध्यक्षा कविता उइके, सभापती शीतल राऊत, महिला अध्यक्षा जयश्री बोरकर, तसेच रमेश पारधी, मदन रामटेके, स्वाती वाघाये, पूजा ठवकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, तालुका व शहर अध्यक्ष, आजीमाजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *