पहाटेच्या गस्तीदरम्यान धारदार शस्त्रासह चार आरोपींना ठोकल्या बेळ्या
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असलेल्या तुमसर पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास एका संशयास्पद वाहनाची झडती घेऊन धारदार शस्त्रासह चार आरोपींना ताब्यात घेतले. खापा चौक परिसरातील नागराज ढाब्यासमोर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ११ एप्रिल रोजी पहाटे ३:०५ ते ३:४० च्या सुमारास तुमसर पोलीस पथक शहरात गस्त घालत होते. गस्ती दरम्यान खापा चौक येथील नागराज ढाब्या समोरील सर्विस रोडवर एक संशयास्पद चारचाकी वाहन क्र. एम एच ४८-५-८१०३पोलिसांना दिसून आले.
पोलिसांनी तत्काळ वाहन थांबवून त्याची कसून तपासणी केली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बसलेल्या इसमांकडे एक लोखंडी धारदार कोयता मिळून आला. सदर शस्त्र बाळगण्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना मिळून आला नाही. आरोपी हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगून फिरत असल्याचा दाट संशय पोलिसांना आला.पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे यात शुभम श्रीधर भुरे (वय २२, रा. इंदुरका), राकेश रामराव सेलोकर (वय २९, रा. शहापूर), राकेश धनराज कुंभलकर (वय २६, रा. लावेसर), देवेंद्र रवि साठवणे (वय १९, रा. पाचगाव) या चौघांविरुद्ध तुमसर पोलीस स्टेशनमध्ये ५४४/ २०२६, कलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीचंद गंगवानी यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी घटना टळल्याची चर्चा नागरिक करत आहेत.









