१२ व १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, ट्रॅक्टर व पैदल यात्रा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांच्या विविध न्याय मागण्या व हक्कासाठी वारंवार आंदोलन करूनही मागण्या पूर्ण केल्या जात नाही. यामुळे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रसत संघर्ष समितीच्यावतीने दि. १२ व १३ एप्रिल रोजी खापरी रेहपाडे ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा असा भव्य बैलगाडी, ट्रॅक्टर व पैदल याचा काढून जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने आज दि. ६ एप्रिल रोजी भंडारा विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाला ३८ वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटत नाही. अनेकदा आंदोलन करण्यात आले. वैनगंगानदीत जलसमाधी आंदोलन केले. झाडावर व पाणीच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. आझाद मैदान मुंबई येथे सुद्धा आंदोलन केले. परंतु, राज्य सरकार व प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्णतः बाधित ३४ गावांमधून नेरला ते खापरी रेहपाडे हे गाव संपादित असून अजूनपर्यंत नवीन गावठान तयार करण्यात आलेला नाही. या ३४ गावात १८नागरिक सुविधा अपुऱ्या आहेत, त्या पूर्ण करण्यात याव्या. दि. १८ एप्रिल २०२३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्के धर्तीवर विशेष भरती राबविण्यात यावी. शासकीय सेवेत ५ टक्के आरक्षणावरून १५ टक्के आरक्षण देण्यात यावे. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये पुर्ण संच जलसाठा २४५.५०० त. मी. नेबाधित होणाऱ्या भंडारा विधानसभामधील ३२ गावाचे पुनर्वसन आणि बॅक वॉटरनी बाधित होणाऱ्या व नवीन ७५ टक्के जमिन भुसंपादित झालेल्या कायद्यानुसार (२०१३ च्या कलम ३० नुसार) शासनास प्रस्ताव सादर करून मोबदला देण्यात यावा. पुर्ण बाधित प्रमाणे अंशतः बाधित प्रकल्प ग्रस्तांना कृषी मजुरी एकमुस्त रक्कत देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाऊ कातोरे म्हणाले. पत्रकार परिषदेत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अतुल राघोर्ते, सचिव दिलीप मडामे, सहसचिव मनीषा भांडारकर, कोषाध्यक्ष विनोद वंजारी, संपर्क प्रमुख आरजू मेश्राम, महेश हजारे, लक्ष्मण जमजारे, नानेश्वर हजारे, कोमल दुबे, पुजा पाटील, अभिषेक लेंडे, अनुष्का पाटील, अजय रेहपाडे यांच्यासह इतर प्रकल्पग्रसत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *