तुमसर बाजार समितीत हमालांचा एल्गार; आंदोलनाचे रणशिंग फुंकले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या हमाल, मापारी, टोपलेवाले आणि काटेवाले कामगारांच्या संयमाचा बांध अखेर फुटला असून, त्यांच्या हक्कासाठी आता उघड संघर्षाचे रणशिंग फुंकले गेले आहे. हमाल माथाडी कामगार कृती समितीने एआयएसएफचे वैभव चोपकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देत जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदन सादर केले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या मागण्या, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि आर्थिक अन्यायामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बाजार समितीचा मुख्य कणा असलेल्या या कामगारांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप कृती समितीने केलाआहे.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांच्या नोंदणीपासून ते त्यांच्या सुरक्षेपर्यंत कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वात नाही. हमाली दरात वाढ नाही, बोनस नाही आणि सामाजिक सुरक्षेचा कोणताही आधार नसल्याने कामगारांचे जीवन अधिकच असुरक्षित बनले आहे. कृती समितीने प्रशासनासमोर ठोस मागण्यांची यादी ठेवली आहे. यामध्ये सर्व हमालांची अधिकृत नोंदणी व ओळखपत्रे, हमाली दरवाढ, दिवाळी बोनस, व्यापारीहमाल-समिती यांच्यात नवीन त्रिपक्षीय करार, हमाल भवन उभारणी, ५ लाखांचा विमा, सेवानिवृत्ती अनुदान आणि सुरक्षा साहित्याची उपलब्धता या मागण्यांचा समावेश आहे. तसेच कामाच्या वेळा निश्चित करणे आणि गैरवर्तनाविरोधात कडक कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात केवळ कामगारांचेच नव्हे, तर शेतकऱ्यांचे प्रश्नही मांडण्यात आले आहेत.किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांसाठी अद्ययावत “शेतकरी भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. कृती समितीचे नेते शेखर सेलोकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “बाजार समितीचा डोलारा हमालांच्या कष्टावर उभा आहे. मात्र आज तोच घटक दुर्लक्षित आहे. येत्या आठवडाभरात आमच्या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास, सर्व हमाल बांधवांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.’ या पार्श्वभूमीवर, तुमसर बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *