अगरबत्ती कुटीर उद्योग आगीत स्वाहा, ५ लाखांचे नुकसान

 दै. लोकजन वृत्तसेवा जवाहरनगर :- भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप परिसरातील महात्मा गांधी वॉर्ड क्रमांक चार येथील निवासी रंजीत विश्वनाथ मेश्राम (४३) यांच्या अगरबत्ती तयार करणाऱ्या कुटीर उद्योगाला गुरुवार, २ एप्रिलला पहाटे भीषण आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. पहाटे सुमारे चार ते पाच वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या नागरिकाच्या निदर्शनास उद्योग समूहाच्या खिडकीतून धूर येताना दिसला. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. धूर दिसताच उद्योगाचे मालक रंजीत मेश्राम यांनी तातडीने दुकानाचे शटर उघडून आत पाहिले असता,

आगीने आधीच रौद्र रूप धारण केलेले दिसून आले. त्यांनी मिळेल त्या साहित्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा भडका वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर भंडारा नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीने पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग काही वेळात आटोक्यात आणण्यात यश आले. या उद्योग समूहामध्ये एक पुरुष आणि चार महिला कामगार नित्याने काम करीत होते. आगीमुळे उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल पूर्णतः जळून खाक झाला असून तयार माल, साहित्य आणि इतर उपकरणांचेही नुकसान झाले आहे.प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कामगारांचेही रोजगाराचे संकट उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *