पालकमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- राज्यातील १८ हजार सरकारी शाळा बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकारने घातला असल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने रविवारी जनता दरबारासाठी तुमसर दौऱ्यावर असताना पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून ताफा अडवला व जोरदार नारेबाजी करीत निषेध नोंदवला. तुमसर येथील जुना बस स्थानक परिसरात आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून गाडीवर पत्रक फेकले व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
महसूल कार्यालयातील नियोजित जनता दरबारासाठी जात असलेल्या पालकमंत्री मंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ताफा अडवण्यासाठी एआयएसएफचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.विशेष म्हणजे सदर आंदोलन शहीद दिनाच्या एक दिवसाआधी झाले असून भगतसिंग यांनी सेंट्रल असेम्ब्ली मध्ये ज्या पद्धतीने आवाज करणारे बॉम्ब टाकत पत्रक फेकले होते. त्याची पुनरावृत्ती तुमसर शहरामध्ये झाली. आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चौपकर यांच्यासह आंदोलक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना तातडीने ताब्यात घेतले. भाजप सरकार खाजगीकरणाला खतपाणी घालून सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी वैभव चोपकर यांनी केला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले असतानाही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे “पालकमंत्र्यांपेक्षा पोलीस प्रशासन मोठे आहे का?’ असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.









