वाढीव बफर झोनमुळे नुकसान न होता रोजगार वाढेल
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोलीचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे यांची माहिती
(काशिनाथ ढोमणे)भंडारा :- नवेगाव नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये १४५ गावातील १२४१.२८ स्के. किलोमीटरची वाढ करण्यात आली. यामुळे काही गावकरी विरोध करीत आहेत. मात्र कोणताच फरक पडणार नाही, गावे उठणार नाहीत, जे अधिकार गावकऱ्यांना आता आहेत, तेच अधिकार राहतील. उलट मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतील. बफर क्षेत्र वाढल्याने नागरिक आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढू नये तसेच वन्यजीवांना ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जातील अशी माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोलीचे उपसंचालक प्रितमसिंग राठोड यांनी पत्रकारांना दिली.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे भंडारा जिल्ह्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष पत्रकार अभ्यास दौऱ्याचे आयोजन १८ मार्च २०२६ रोजी पिटेडारी पर्यटन गेट येथे करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश माध्यमांना व्याघ्र संवर्धन, जैवविविधता आणि वन व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष माहिती व नवेगांव नागझिरा प्रकल्पाच्या विकासाकरीता प्रसार माध्यमांचे महत्व पटवुन देणे हा होता.
पत्रकारांना जंगल सफारीद्वारे प्रकल्पातील विविध वनक्षेत्र, जलस्रोत, तसेच वन्यजीवांचे अधिवास पाहण्याची संधी मिळाली. यावेळी व्याघ्र, बिबट्या, रानगवा, हरिण, विविध पक्षी प्रजाती तसेच स्थानिक जैवविविधतेबाबत तसेच प्रकल्पाच्या एकसंघ नियंत्रणामुळे स्थानिक लोकांना होणारे फायदे यावर माहिती देण्यात आली.
प्रितमसिंग कोडापे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत व्याघ्र संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त व्यवस्था, मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण, जलसंधारण कामे, तसेच स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग या बाबीवर सखोल माहिती दिली.
तसेच निसर्ग शिक्षण व जनजागृती कार्यक्रमांद्वारे स्थानिक समुदाय आणि विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रकल्पाच्या एकसंघ नियंत्रणामुळे स्थानिक लोकांना होणारे फायदे यावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
या पत्रकार अभ्यास दौ-यामुळे पत्रकारांना प्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून, त्यांच्या माध्यमातून समाजात वन्यजीव संरक्षणाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास सहाय्यक वन संरक्षक श्रीमती मनिषा चव्हाण, सुहास कांबळे आणि वन परिक्षेत्र अधिकारी सागर बारसागडे, सूरज गोखले, जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ दांदाडे सह इतर क्षेत्रीय वन अधिकारी/कर्मचारी व उपस्थित होते.









