दिव्यांग बोर्डसमोर हजर न झालेल्या ४६ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची फेर तपासणी सुरू आहे. परंतु, तुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून ४६ दिव्यांग अधिकारी व कर्मचारी दिव्यांग बोर्डसमोर हजर न झाल्याचे कळविले आहे. शिक्षण विभागाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दिलेल्या १८१ जणांच्या यादीपैकी अद्यापही ४६ जण प्रत्यक्ष फेरतपासणीकरीता दिव्यांग बोर्डासमोर हजर झालेले नाहीत. केवळ दिव्यांगत्व व दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील आवक-जावक विभागात लेखी अर्ज सादर केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये यांनी ५ मार्च रोजी प्रत्यक्ष पडताळणीकरीता हजर न झालेल्या दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी मुुख्य कार्यपालन अधिकारी मिलिंद साळवे यांच्याकडे सादर केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात सीईअोंच्या आदेशानुसार १३ मार्च रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांना दिव्यांग वदिव्यांगत्व फेरतपासणीसाठी हजर न झालेल्या ४६ दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादीपाठविली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील दिव्यांग बोर्डासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यासंबंधीचे तातडीचे पत्र दिले आहे. बोगस दिव्यांगत्वामुळेच अनेकजण टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आता शिक्षण वतुर्ळात रंगताना दिसत आहे. यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या तपासणीकडे लक्ष लागले आहे.







