आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?

सोलापूर:- नगरपरिषदांच्या नगरसेवकांना सरपंचाप्रमाणे, निदान उपसरपंचाएवढं तरी मानधन द्यावं अशी मागणी बार्शी नगरपालिकेतील नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत व नगरपरिषद या संस्था जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी थेट संबंधित आहेत.

या संस्थांमध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच आणि नगरपरिषदेचे नगरसेवक हे लोकप्रतिनिधी गाव व शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च करून काम करीत असतात. गावचे सरपंच आणि उपसरपंच यांना मासिक मानधन मिळते, मात्र नगरपालिका, नगरपरिषदेतील नगरसेवकांना केवळ ४०० रुपये मिटींग भत्ता मिळतो, असे म्हणत नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी अक्कलकोटे यांनी केलीय. गावात ग्रामपंचायत आणि शहरात नगरपरिषद स्तरावर लोकप्रतिनिधींवर मोठ्या जबाबदाऱ्या असतात. अनेक कामे करताना लोकप्रतिनिधींना स्वतःचा वेळ, प्रवास खर्च व इतर खर्च करावा लागतो. परंतु, त्यानुसार मानधन मिळत नसल्याने गावस्तरावरील बहुतांश लोकप्रतिनिधींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना तुलनेने जास्त मानधन दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, वाढतीमहागाई लक्षात घेता मानधनात वाढ करावी, अशी मागणी अक्कलकोटे यांनी केली आहे. विशेष म्हणजे अक्कलकोटे यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनाकडे लक्ष वेधत नगरसेवकांना अवघे ४०० रुपये भत्ता मिळतो, असेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *