सुरळीत गॅस सिलेंडर पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी नागरिकांना नियमानुसार व वेळेत घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होईल याची खात्री करावी तसेच परिस्थितीचा गैरफायदा घेत कोणताही आर्थिक लाभ घेण्याचा किंवा नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, तसेच पुरवठा विभागातील अधिकारी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील २४ गॅस एजन्सी धारकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीत काही प्रमाणात अडचणी येत असल्याचे तसेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंग केल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे एजन्सी धारकांनी बैठकीत सांगितले. मात्र अशा कठीण परिस्थितीत सामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. कोणताही अवाजवी दर किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी भंडारा शहरातील गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन वितरणाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असा संदेशही त्यांनी दिला. भंडारा जिल्ह्यात एचपीसीएल, आयओसीएल आणि बीपीसीएल या तीन कंपन्यांमार्फत प्रामुख्याने गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. त्यापैकी एचपीसीएल कंपनीतर्फे सर्वाधिक म्हणजे १३ एजन्सींना पुरवठा केला जातो. या सर्व एजन्सींच्या सेल्स ऑफिसर्सचीही लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत काही अडचण असल्यास ०७१८४-२५००४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






