बेकायदेशीर ३७ गॅस सिलिंडरचा साठा जप्त; भंडारा जिल्हा पुरवठा विभागाची कार्यवाही

भंडारा:- जिल्हा पुरवठा विभागाने आज दि. १२ मार्च २०२६ रोजी एका विशेष मोहिमेअंतर्गत दोन ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पहिली कारवाई भंडारा शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील हिमांशु पान पॅलेसच्या बाजूला व सायकल रिपेअरिंग दुकान यांच्या मधातील नागेत करण्यात आली. या ठिकाणी HPCL. कंपनीचे ४ घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळले. दुकान मालक नरेश श्रावण माकडे याच्याकडे सिलिंडरबाबत कोणतेही वैध कागदपत्रे किवा खरेदी पावती उपलब्ध नव्हती. प्रशासनाने हे चारही सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले आहेत.

*CSC केंद्रावर मोठी कारवाई*
दूसरी कारवाई दवडीपार येथील सी.एस.सी. सेंटरवर (CSC Center) करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या केंद्राची तपासणी केली असता, तेथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, श्री. संदेश विलास रामटेके आणि श्री. मंगेश विलास रामटेके हे एकाच ठिकाणाहून दोन स्वतंत्र सी.एस.सी. सेंटर्स चालवत होते. तपासणीत या ठिकाणी एकूण 33 गॅस सिलेंडर आढळून आले. यातः HPCL. कंपनीचेः १४ सिलिडर (१ भरलेला, १३ रिकामे), इंडेन कंपनीचे: १९ सिलेंडर (रिकामे) तपासणी दरम्यान संबंधित चालकांकडे ग्राहकांचे घरगुती गॅस वितरणाचावतचे कोणतेही पासबुक आढळून आले नाही. साठवणुकीचा कोणताही परवाना मिळून आला नाही. ग्राहकांचे सिलिडर असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकृत मर्यादपेक्षा जास्त साठा असल्याने हे सर्व सिलिडर जप्त करण्यात आले. प्रशासकीय पथक आणि पंचनामा या दोन्ही कारवायांमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. नरेश वंजारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रतनलाल ठाकरे, धान्य खरेदी अधिकारी श्री. सुहास टोंग, आणि निरीक्षण अधिकारी भंडारा श्री. पांचरीराम कापडे, श्री. रोशन कापसे निरीक्षण अधिकारी लाखनी, श्री. रविंद्र उन्हाळे निरीक्षण अधिकारी साकोली यांचा समावेश होता. दोन्ही ठिकाणी पंचांच्या उपस्थितीत सविस्तर पंचनामा करून जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून ज्वलनशील पदार्थाचा असा बेकायदेशीर साठा करणे धोकादायक असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

“जिल्ह्यात कुठेही घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार अथवा अवैध वापर किया बेकायदशीर साठवणूक होत असल्यास नागरिकांनी प्रशासनास कळवावे. अशा प्रवृत्तीविरुद्ध कडक मोहीम राबवली जाईल.”
-नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *