तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच फडकला आयटकचा लालबावटा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विदर्भातील सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या हमाल कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन व व्यापारी वर्गाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) च्या लालबावट्याखाली हमाल कामगारांची संघटनात्मक बांधणी करण्यात आली. या बैठकीत २०० हून अधिक हमाल कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ३५ सदस्यीय हमाल युनियन समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या समन्वयक पदी कॉम्रेड वैभव चोपकर यांची निवड करण्यात आली.

कामगारांनी सभासद नोंदणी फी भरून मोठ्या उत्साहात संघटनेचे सभासदत्व स्वीकारले व लाल बावटा हाती घेत आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष उभारण्याची तयारी दर्शवली. वर्षानुवर्षे कष्टाचे काम करूनही हमाल कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा व मूलभूत सुविधा नाकारल्या जात आहेत. या अन्यायाविरोधात आता संघटित शक्तीच्या जोरावर लढा उभारला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोहाडी तालुका सचिव कॉम्रेड अनिल गाढवे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी हमाल कामगारांना संघटित होण्याचे महत्त्व पटवून देत ङ्गसंघटित कामगार शक्तीसमोर कोणतीही अन्यायी व्यवस्था टिकू शकत नाही, असे सांगत आयटकच्या माध्यमातून हमाल कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र लढा उभारण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *