रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले;कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून सीबीआयने देखील याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित यांनी युगेंद्र पवार आणि कार्यकर्त्यांसह बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
मात्र, पोलिसांनी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर, रोहित पवारांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत चर्चा केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी विधिमंडळ सभागृहात भेट घेतली. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदार, मंत्री आणि दिग्गज नेते विधिमंडळातच आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा प्रकर्षणाने लावून धरला आहे. रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्याची भेट घेण्याचं कारण हे, माझ्या आणि महाराष्ट्रातील सर्वांच्या मनात ज्या शंका आहेत, त्या शंका घेऊन मी मुख्यमंत्र्यांपुढे बाजू मांडली. सगळे रिसर्च पेपर आणि कागदपत्रे माझ्याकडे आले आहेत, ते मी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
देशातही आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडे ही बाजू मांडावी. या चौकशीत पारदर्शकता यावी अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, आणखी काही कागदपत्रांची मागणी त्यांनी माझ्याकडे केली, ती कागदपत्रे घेऊन ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटतील, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडून हा अहवाल येणार आहे, उद्यापार्यत हा अहवाल येईल अशी अपेक्षा आहे. थातूरमाथुर अहवाल देऊ नका डिटेल्स अहवाल आम्हालाहवा आहे. सोमवारी ११ वाजता मी डिटेल्स पत्रकार परिषद घेणार आहे. आणखी काही गोष्टी समोर आणणार आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.









