महाराजस्व अभियान शिबीरांचे यशस्वी आयोजन करा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे निर्देश
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभागाच्या वतीने मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ व नगर परिषद स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभीयान समाधान शिबीर अभियान टप्पा १ राबविले जाणार आहे. नागरिकांचे दैनंदिन महसुली प्रश्न तात्काळ निकाली काढणे, डिजिटल सेवांचा वापर वाढविणे व “सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ द्वारे सेवा पुरविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून यासाठी भंडारा महसूल प्रशासनाने या शिबीरांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज महसूल विभागाच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी सावन कुमार, अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हयातील प्रलंबित पण महत्वाच्या बाबींचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. पुनर्वसन उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी यावेळी सादरीकरण केले. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांच्या गावाचा तसेच पुर्नवसनाचा आढावा घेऊन विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पाविषयीचे अद्यावत माहिती घेतली. नवीन (व्हिबी जी राम जी ) म्हणजेच विकसीत भारत गॅरटी फॉर रोजगार ॲण्ड जीवीका मिशन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्माणाधीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. बांधकामासाठी निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार यांनी दिली.
बांधकाम जलदगतीने करून मे २०२७ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक वास्तू निर्माण करण्याची निर्देश त्यांनी दिले. झुडपी जंगलबाबत वेळोवेळीशासनाकडुन प्राप्त निर्देशानुसार प्रस्तावांवर कार्यवाही करावी. झुडपी जंगलाबाबतचे ५१४ प्रस्तावांपैकी १०९ प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले असून त्यापैकी उर्वरित प्रलंबित प्रकरणांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी पूजा पाटील यांनी दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर शिबिरांचे आयोजन करावे. त्यासाठी समन्वय अधिकारी नेमावे, या शिबीराव्दारे विद्यार्थी, नागरिक, शेतकरी यांचे समस्या तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन बिदरी यांनी केले.
सामान्य नागरिकांसाठी शासनातर्फे पट्टेवाटपची प्रक्रिया सुरू असून जिल्हा प्रशासनाने पट्टे वाटपाच्या प्रक्रियेला पट्टेधारकांकडून विहीत शुल्क जमा करून महसूल अभियानांतर्गत पट्टे वाटप करण्याचे उद्दिष्ट देखील त्यांनी यावेळी दिले. वाळू धोरण अंतर्गत भंडारा जिल्ह्यामधील कामका समाधानकारक असून नजुलधारकांचे देखील या शिबिरामध्ये शिबीर घेण्याचे व भाडे वाटप करून घेण्याबाबतचे त्यांनी निर्देश दिले. महसूलमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराजस्व अभियान हा महसूल विभागाचे महत्वकांक्षी कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी गांभीर्याने या अभियानाची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या कामांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. यंत्रणांना निधी वितरण झाले असून कामकाज सुरू असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी बोरीगडे यांनी सांगितले असता, दर आठवड्यात अधिनस्त यंत्रणांचा आढावा घेण्यात यावा व खर्चाची कमी गती असणाऱ्या विभागांना प्रामुख्याने व जबाबदारीने निधी योग्य वेळेत खर्च करण्याबाबत निर्देश देण्याची सूचना बिदरी यांनी केली. बळकटीकरण अंतर्गत महसूल प्रशासनाला वाहने, आयपॅड, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर आधी सुविधांनी कार्यालय सुसज्ज असले पाहिजे तरच यंत्रणातील सर्व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, त्यादृष्टीने कार्यालयीन बळकटीकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घातले पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.
आढावा बैठकीनंतर दवडीपार येथे भेट दिली. तसेच नागरीकांच्या अडचणी व मागणी ऐकून दवडिपार गावाचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले. त्यानंतर पहेला येथील जिल्हा परिषद उच्चब प्राथमिक शाळेला व अंगणवाडीलाही विभागीय आयुक्तांनी भेट दिली. त्यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदीर पहेला येथे भेट दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी मिलींद सोमकुंवर यांनी त्यांचे स्वागत केले व नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधाविषयी आयुक्तांना माहिती दिली.









