दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा साकोली पोलिसांकडून पर्दाफाश

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठल कुंभरे (वय ५४) यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये ठेवलेली त्यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन साकोली येथे दि. १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, साकोलीचे पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांना एक गोपनीय माहिती मिळाली, मौजा सानगडी येथे भिमसेन रामटेके आणि सचिन तरोणे हे दोन संशयित एका चोरीच्या मोटारसायकलचा सौदा करत असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. यामाहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्या इसमांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल मिळून आली. पोलिसांनी या प्रकरणी दि. १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ०२.२१ वाजता आरोपींना अटक केली.

पोलिसांनी या आरोपींकडे केलेल्या अधिक सखोल चौकशीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीमध्ये भिमसेन माणिक रामटेके (वय २१), कुंदन शांतीप्रसाद भैसारे (वय १९) (दोघेही रा. बोंडगाव/ देवी), सचिन विलास तरोणे (वय २४, रा. दाभणा), आणि धम्मदिप जैतलाल रामटेके (वय ३५, रा. बाकटी, ता. अजर्ुनी मोरगाव, जि. गोंदिया) या चार सज्ञान आरोपींसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने साकोली पोलीस स्टेशन हद्दीतील ०९, लाखनी येथील ०१, पालांदूर येथील ०१ आणि गोंदिया जिल्ह्यातील ०८ असे एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी एकूण १९ ठिकाणांहून चोरलेल्या मोटारसायकलींपैकी ०५ मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे संपूर्ण सुटे भाग एका कबाडीवाल्याला विकले होते, त्यामुळे संबंधित कबाडीवाल्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.या कारवाईत पोलिसांनी एकूण १४ मोटारसायकली हस्तगत केल्या. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ६ लाख ९० हजार इतकी आहे.

या गुन्ह्यांचा पुढील तपास सध्या सुरू आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे व पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले, पोलीस हवालदार अनिफ राऊत, आणि पोलीस अंमलदार गौतम थुलकर, महेश नैताम, नरेंद्र झलके, धनविजय गणविर, व राहुल गायधने या साकोली पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *