स्व. सुभाषराव डूंभरे यांच्या स्मृतीत प्रवासी शेड
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर : “समाजाने दिलेलं प्रेम आणि विश्वास याची परतफेड करण्याची वेळ आली, तर ती कृतीतूनच व्हायला हवी,’ या भावनेतून डूंभरे ज्वेलर्स यांनी स्थानिक बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सुसज्ज प्रवासी शेड उभारून एक आदर्श सामाजिक उपक्रम साकारला आहे. नागपूर, भंडारा व पुढील मार्गावरील बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना वर्षानुवर्षे उन्हात-पावसात उभे राहावे लागत होते.
या गैरसोयीची जाणीव ठेवत स्वर्गीय सुभाषराव डूंभरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा लघु बसस्थानक प्रकल्प उभारण्यात आला. या शेडचे उद्घाटन मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमास माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, अनिल सुरजन, प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने प्रादेशिक व्यवस्थापक, किशोर आदमने, संदीप खवळे, शीतल शिरसाट, मोहन कानफाडे, अभय भागवत, सतीश कटारे,घनश्याम जांगळे, श्याम अग्रवाल, विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर, प्रादेशिक अभियंता महेंद्र नेवारे, आगार प्रमुख कन्हैया भोगे, सारिका लिमजे, अर्चना मसरके, संध्या सुभाष डूंभरे यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी संचालन लायन मनोज उकरे यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील सामाजिक जाणीव आणि डूंभरे कुटुंबाची समाजसेवेची परंपरा अधोरेखित केली. प्रमोद बारई यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा यावेळी करण्यात आले. यावेळी डुंबरे ज्वेलर्स चे संचालक मंगेश डूंभरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्या कुटुंबाचे प्रेरणास्थान स्वर्गीय सुभाषराव डूंभरे यांच्याकडून आम्हाला समाजासाठी काहीतरी करण्याची शिकवण मिळाली. त्यांच्या स्मृतीतून समाजोपयोगी कार्य व्हावे, हीच भावना या प्रवासी शेडच्या उभारणीमागे आहे.
तुमसर आगारा मध्ये अनेक सुविधा पूर्वीही होत्या.परंतु बसचा थांबा प्रवाशी बसने न जाता विरुद्ध बाजूला असल्यामुळे प्रवाशांना झाडाखाली उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. उन्हाळ्यात कडक उन्हाचा तडाखा, तर पावसाळ्यात पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. नव्याने उभारलेल्या शेडमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित व सुसज्ज आसरा उपलब्ध झाला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र ढोमणे, नितीन डूंभरे, आर्य मर्जीवे, राजेश मर्जीवे, अतुल डूंभरे, अंशुल ढोमणे, मनोज उकरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. डूंभरे ज्वेलर्सचा हा उपक्रम केवळ एक बांधकाम नसून समाजाशी असलेल्या नात्याची जपणूक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दर्शविणारा आदर्श आहे. व्यवसायाबरोबरच समाजसेवेची कास धरल्यास परिवर्तन शक्य आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.









