गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करायला गेला असता पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळ च्या सुमारास घडली. गौरव फंदुलाल मडावी (२५, रा. मंदीटोला, तालुका सडक अजर्ुनी), असे मृत तरूणाचे नाव आहे. गौरव मडावी हा सालेकसा तालुक्यात बिजेपार येथे त्याचा मावशा जियालाल मडावी यांच्या तेरावा (देवकारण) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी आला होता.
रविवारी दुपारी कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेले रायपूर येथील हर्ष श्रावण कोडापे (२४) आणि बिजेपार येथील कैलास दयाराम मडावी (३४) यांच्या सोबत गौरव मडावी हा बिजेपारमक्काटोला मार्गावर वारकरीटोला गावाजवळून वाहत असलेल्या पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करायला गेला होता. कालवा पूर्ण भरून वाहत असताना तो आंघोळ करायला खाली उतरला असता त्याचा तोल गेला आणि कालव्यात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिस ठाणे आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले. कालवा पूर्ण भरून असल्याने शोध घेण्यात अडचण येत होती व तेव्हा पाणी बंद करून स्थानिक युवकांनी शोधमोहीम चालवली. अखेर अर्ध्या किलोमीटर अंतरावर गौरवचा मृतदेह सापडला. सालेकसा पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्रकरणाचा पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.









