धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रेस भंडाऱ्यातून उत्साहात प्रारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभावनेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारी “धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रा’ उत्साहपूर्ण वातावरणात भंडारा येथून रवाना झाली. शुभांगी सुनील मेंढे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ५० मातृशक्तींचा समूह पवित्र प्रयागराज – अयोध्या – काशी या त्रिस्थळी यात्रेसाठी प्रस्थान केला. यात्रेपूर्वी भंडारा शहरातील खात रोडवरील बहिरंगेश्वर मंदिर येथे विधिवत पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. ईश्वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे यांनी झेंडी दाखवून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी यात्रेकरूंना मंगलमय प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. शुभांगी सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही यात्रा केवळ धार्मिक प्रवास नसून महिला सक्षमीकरण, संस्कार संवर्धन आणि हिंदू संस्कृतीच्या जागृतीचा प्रभावी उपक्रम म्हणून पाहिली जात आहे.

या यात्रेमुळे सहभागी महिलांना अध्यात्मिक उन्नतीसोबतच राष्ट्रभक्ती, एकात्मता आणि सामाजिक नेतृत्वाची प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागांतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या यात्रेला लाभला असून, सुरक्षित व शिस्तबद्ध नियोजनामुळे यात्रेचे वातावरण भक्तिमय आणि उत्साहवर्धक झाले आहे. सर्व यात्रेकरूंना सुरक्षित, मंगलमय आणि पुण्यप्रद दर्शनयात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. ही त्रिस्थलीय यात्रा भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरत असून, समाजजीवनात सकारात्मक ऊर्जा आणि सांस्कृतिक बळकटी निर्माण करणारा उपक्रम म्हणून तिचे स्वागत केले जात आहे. याप्रसंगी माजी खासदार सुनील मेंढे यांच्या सोबत, विश्व हिंदू परिषदेचे प्रकाश पांडे, दिपा नायर, ममता दलाल, क्रिष्णा हत्तीमारे, तुषार काळबांधे, अतुल दिवाकर, चैतन्य उमाळकर, विजय निचकवडे, संतोष त्रिवेदी, शशी वैद्य, गिरिधारी कोरे, मनोज मुलकलवार, प्रफुल्ल उमाळकर, राजुजी भोजवानी व आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *