अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- अवैध रित्या विना रॉयल्टी ने रेती वाहतूक करतांना ट्रॅक्टर मिळून आल्याने चालक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचेकडून ६ लाख ९१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिशुपाल परसराम नेवारे (३७) व मालक भागवत महादेव भेंडारकर (५२) रा. सोमनाळा अशी आरोपींची नावे आहेत.
या कारवाईने अवैध गौण खानिज व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. चुलबंध रेती घाटातून अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहिती वरून लाखनी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रकाश न्यायमुर्ते हे खाजगी वाहनाने पोहरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोहरा माईन्स परिसरात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रविवारी मध्यरात्री (ता. १६) १वाजताच्या सुमारास हिरव्या रंगाचा जॉन डियर ट्रॅक्टर विना परवाना रेती भरून वाहतूक करतांना आढळून आल्याने जप्त करून पोलिस स्टेशन ला आणण्यात आले. यात ६ लाख ९१ हजाररुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलिस हवालदार प्रकाश न्यायमूर्ते यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी चालक आणि मालक यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहेत.