तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथे वाघ मृतावस्थेत आढळला
भंडारा:- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक 65 राखीव वन या ठिकाणी आज दि. १७ फेब्रुवारी रोजी वन्य प्राणी वाघ मृतावस्थेत आढळला. गुराख्यामार्फत वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी यांना सांय. ४.३० वाजता च्या सुमारास मिळाली. घटनेची माहिती प्राप्त होताच वनाधिकारी / कर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृत वाघाची व घटनास्थळाची वनाधिकारी यानी पाहणी केली.
मृत वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे 3-4 वर्षे असल्याचे निदर्शनास आले.मृत वाघाच्या तोंडावर, मानेवर व मागील पायाला जखमा असल्याचे दिसून आले. तसेच मृत वाघाचे सर्व अवयव साबूत असल्याचे देखील निदर्शनास आले.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या प्रमाणभूत कार्यपद्धती (SOP) नुसार गठित समितिद्वारे घटनास्थळ व मृत वाघाची पाहणी करण्यात आली.
सदर समिती मध्ये प्रधान मुख्य वन संरक्षक(वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे प्रतिनिधी पंकज देशमुख, मानद वन्यजीव रक्षक भंडारा ,राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA)चे प्रतिनिधी म्हणून SEAT या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य श्री. ज्यूड पिचर यांचा समावेश करण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूमध्ये डॉ.बारापात्रे, पशुधन विकास अधिकारी, नाकाडोंगरी, डॉ. नंदेश्वर, पशुधन विकास अधिकारी, तुमसर व डॉ. आशिष गटकळ, पशुधन विकस अधिकारी, सिहोरा यांचा समावेश करण्यात आला.
सदर मृत वाघाचे शव वनाधिकारी यानी ताब्यात घेतले असून आज सूर्यास्त झाला असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेल्या चमु मार्फ़त उद्या दिनांक १८ रोजी सकाळी मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेद नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र बाह्य परीक्षणावरून सदर वाघाचा मृत्यू हा दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा,अशा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमुद्वारे वर्तविण्यात आला आहे .
तसेच वाघाच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी मृत वाघाचे नमुने उत्तरिय तपासणी करता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
या प्रकरणी वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपासाची कार्यवाही राहुल गवई,उपवनसंरक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात, रितेश भोंगाडे प्रकाष्ठ निष्काशन अधिकारी गडेगाव व कु. अपेक्षा शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी हे करीत आहेत.