स्वप्न पूर्ण होईपर्यंत जिद्द सोडू नका – खा. डॉ. प्रशांत पडोळे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धे करीता सहभागी विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम आणि स्वप्नपूर्तीचा मंत्र सांगताना “जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिद्द सोडू नका. स्वप्न ते नाही जे झोपेत येते, स्वप्न ते असते जे झोपू देत नाही,’ असे प्रभावी प्रतिपादन खासदार प्रशांत पडोळे यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धे च्या उद्घाटनप्रसंगी केले. भंडारा येथील शासकीय अंध विद्यालयात आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याण सभापती शीतल राऊत हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. भंडारा चे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, बांधकाम सभापती नरेशईश्वरकर, जि. प. सदस्य देवा इलमे, रजनीश बन्सोड, समाज कल्याण समिती सदस्य डॉ. स्वाती वाघाये, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आशा कवाडे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कवीश्वर खोब्रागडे, वैसाका शिवशंकर खोब्रागडे, निलेश गाढवे, नितीन मोहतुरे, विनोद उमप, तनुजा नेपाळे, राजेंद्र वाघाळे, प्रमोद सोनकुसरे, रमेश चकोले आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना खा. पडोळे म्हणाले या क्रीडा स्पर्धांमधून दिव्यांग खेळाडूंच्या अंगी असलेली अपार जिद्द, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती दिसून येते, असे सांगून त्यांनी प्रत्येक खेळाडू हासमाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे अधोरेखित केले. अडचणींवर मात करत मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंच्या यशामागे कठोर मेहनत, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद करत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना, समाजाने दिव्यांग खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. भंडाराचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण, आत्मविश्वास व जिद्द यांना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडास्पर्धा हा केवळ औपचारिक सोहळा नसून एक प्रेरणादायी योग असल्याचे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात राऊत यांनी या क्रीडा स्पर्धांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आपली क्षमता ओळखण्याची संधी मिळते, तसेच खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना आणि आत्मसन्मान विकसित होतो, असे त्यांनी नमूद केले. यादरम्यान हिरवी झेंडी दाखवुन क्रीडा स्पर्धा ची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कवीश्वर खोब्रागडे यांनी शासनातर्फे चालविण्यात येणाऱ्या योजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर शहारे यांनी केले तर आभार नितीन मोहतुरे यांनी मानले.









