बाळ विक्री प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोंदिया जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, त्याने स्वतःवर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. सध्या आरोपी असलेला डॉक्टर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नवजात बालिकेवर नागपूर येथे उपचार करण्यासाठी नेत असल्याच्या नावाखाली अडीच लाखात मुलीची विक्री करण्याचे प्रकरण ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यातील दोघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य सूत्रधार असलेल्या डॉ. बाजपेयी याचा शोध सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्याच्या अटकपूर्व जामीनावर भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होते. अटके पासून बचावासाठी धडपडत असलेल्या डॉक्टरांचे एकेक प्रकरण पुढे येत असल्याने त्याचे पाय खोलात जात होते. दरम्यान १४ रोजी कटंगी येथून भंडाराकडे स्वतःच्या वाहनाने येत असताना डॉ. नितेश बाजपेयी याने स्वतःच्या पोटावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या डॉक्टरला आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याच्यावर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजपेयी उपचार घेत असल्याची माहिती संचालकांनी दिली असून आरोपीची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या बाजपेयी याने केलेला हा प्रकार खळबळ माजवीणारा असून आता पोलिसांचे हात लवकरच त्याच्या मुसक्या आवळतील हे स्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *