विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, संदीप पाटील यांनी आज सन २०२५-२०२६ या वर्षाचे भंडारा पोलीस दलाचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच पत्रकार यांचेशी चर्चा केली. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:०० वाजता पोलीस मुख्यालय, भंडारा येथील परेड ग्राउंडवर दिमाखदार संचलनाने झाली.

या वार्षिक निरीक्षण परेडमध्ये पी.टी. परेड, मेडिसिन बॉल, स्क्वॉड ड्रिल, रायफल ड्रिल आणि मॉब डिस्पोजल ड्रिलचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार आणि शाखा प्रभारी अधिकारी पूर्ण गणवेशात उपस्थित राहूनत्यांनी आपल्या तुकड्यांचे नेतृत्व केले. परेडनंतर सकाळी ९:०० वाजता पोलीस बहुउद्देशीय हॉल येथे ‘पोलीस दरबार’ भरवण्यात आला. या दरबाराचा मुख्य उद्देश पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या अडीअडचणी थेट जाणून घेणे हा होता.

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत आश्वस्त केले. त्यानंतर सकाळी १०:०० वाजता एस. पी. १०० उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील एन.जी.ओ. सदस्य, औद्योगिक आस्थापनांचे अधिकारी आणि प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत क्राईम मीटिंग हॉल येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत लोकसहभागातून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर चर्चा करण्यात आली. दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील गुन्हेगारीची स्थिती आणि तपासातील प्रगतीचा सविचस्तर आढावा घेण्यासाठी ‘गुन्हे आढावा बैठक’ आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीसअधिकारी आणि त्यांच्या वाचक फौजदारांसह प्रलंबित सत्र न्यायालयीन गुन्हे आणि तपासातील तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद गतीने करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दिवसाच्या अखेरीस त्यांनी पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण झालेल्या पुरुष बॅरेक चे उद्घाटन सोहळा पार पडला व भंडारा पोलिसांचे नाविन्य उपक्रम ‘दिशा प्रकल्प’ येथे भेट देऊन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधुन त्यांना मार्गदर्शन किला. या वार्षिक निरीक्षणामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता तपासण्यासोबतच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन दिशा मिळाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *