शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शेतपिकांची माहिती मिळण्यासाठी शेतकरी मेळावा घेण्याची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले नाही म्हणून आधुनिक तंत्रज्ञान व शेतपिकांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा घेण्याची मागणी तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे व सचिव अनिल भोयर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये शेती पद्धतींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणून कायमस्वरूपी परिणाम निर्माण करणे, ज्यामुळे कृषी उत्पादकता, पर्यावरणीय शाश्वतता आणि शेतकरी समुदायाचे एकूण कल्याण सुधारेल, यासाठी शेतकरी नेते,तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात शेतकरी मेळावाचा घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये मेळाव्याचे उद्दिष्टे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक आणिशाश्वत कृषी पद्धतींबद्दल माहिती आणि ज्ञान प्रसारित करणे, शेतीतील नवीनतम प्रगती, तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल शेतकऱ्यांना शिक्षित करणे, शेतमालावर विशेष लक्ष केंद्रित करून पीक विविधीकरणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे, शेतकरी, कृषी तज्ञ आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांमध्ये नेटवर्किंग आणि सहकार्य सुलभ करणे, शेतकऱ्यांना जोडण्यासाठी, अनुभव शेअर करण्यासाठी आणि सहयोगी भागीदारी तयार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे,
यासह शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी मार्गदर्शन मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी सचिव अनिल भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, बाजार समितीचे माजी संचालक चंद्रशेखर सेलोकर, कवडू चोपकर, प्यारेलाल पुंडे, धनराज रहांगडाले, शेखर रिनायते, महेश कावळे, कैलाश तीतीरमारे, वसंत कावळे, रविशंकर रहांगडाले, दिगंबर ठवकर, दिलीप लुटे, गौरीशंकर अकतरी यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.









