लाखांदूर तहसीलसमोर फटाके फोडून शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदुरः- तीन महिने लोटूनही शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात आले नाही. याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसीलसमोर धान उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून सरकारचा जोरदार निषेध केला. सविस्तर असे की, शेतकऱ्यांनी आपले धान आधारभूत धान खरेदी केंद्रात विकले. मात्र तीन महिने लोटूनही त्यांचे चुकारे मिळाले नाही. धान खरेदीची लिमीट थांबविल्यामुळे अनेकांचे धान खरेदी करण्यात आले नाही. ही एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच आहे. धान विक्री करूनही पैसे न मिळाल्याने घर कर्ज कसा करावे, कर्ज कसे फेड करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यामुळे शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या निष्क्रीयधोरणाचा निषेध करण्यासाठी आज दि. ३ फेब्रुवारी रोजी शेकडो शेतकरी हातात फटाके घेवून तहसील कार्यालयाच्या पटांगणात एकत्रित आले. त्यांनी आगळावेगळा व आक्रमक आंदोलन करून शासनाचा निषेध म्हणून तहसील कार्यालयाच्या पटांगणातच फटाके फोडले. धान चुकारे द्या, धान खरेदीची लिमीट वाढवा अशा घोषणांनी परिसर दणाणला. आंदोलना दरम्यान जिल्हा पणन अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाची तात्पूर्ती सांगता केली. मात्र दोन दिवसात चुकाने न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. सुरेश ब्राम्हणकर, माजी जि. प. सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, लाखांदूर पंचायत समितीचे सदस्य मंगेश राऊत, धनराज हटवार, रोशन पारधी, गोविंदराव हरडे, विनोद राऊत यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *