अर्थसंकल्पात विकास आत्मनिर्भरता आणि भविष्यनिर्मितीचा आराखडा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आजचा केंद्रीय अर्थसंकल्प हा गेल्या बारा वर्षांत राबविण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा एक ठोस, निर्णायक आणि परिणामकारक टप्पा आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला अधिक बळ देत देशाचा विकास स्थिर, सक्षम आणि वेगवान करण्याची स्पष्ट दिशा या अर्थसंकल्पातून अधोरेखित होत असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी अभ्यासपूर्ण सांगितले.
भंडारा येथे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा आयोजित करण्यात आली. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी, त्यांचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम तसेच ग्रामीण व शहरीविकासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व यावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामध्ये शेती, उद्योग, पर्यटन, रोजगारनिर्मिती, महिला व युवक सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२ लाख कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या दीर्घकालीन विकासाला नवी चालना देणारा ठरणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून, त्याचा थेट लाभ ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत पोहोचणार आहे.
ग्रामीण पायाभूत सुविधा, कृषी आधारित उद्योग, आरोग्य शिक्षण, कौशल्य विकास तसेच संस्थात्मक क्षमतावृद्धी यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या प्रमुख तरतुदींमध्ये ग्रामीण रस्ते प्रकल्पासाठी ३७८ कोटी रुपये, ऍग्री बिझनेस नेटवर्कसाठी १६७ कोटी रुपये, इकॉनॉमिक क्लस्टर विकासासाठी २८३ कोटी रुपये, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रमासाठी ३८५ कोटी रुपये, तसेच उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरणासाठी २०७ कोटी रुपये यांचा समावेश आहे. याशिवायऍग्री बिझनेस व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ६४६ कोटी रुपये, कौशल्य व मानवी विकासासाठी अनुप्रयुक्त ज्ञान विकासासाठी ३१३ कोटी रुपये, आणि जिल्हा स्तरावरील संस्थात्मक क्षमता वृद्धीसाठी २४० कोटी रुपये इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशू गोंडाणे, नगराध्यक्ष सौ. माधुरी मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, भगवान घोनमोडे, जि. प. गटनेते विनोद बांते उपस्थित होते.









