दरवाढीच्या मागणीसाठी भंडारा जिल्हा बोअरवेल असोसिएशनचा अनिश्चितकालीन संप
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- भंडारा जिल्हा बोअरवेल असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अनिश्चितकालीन संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती मानेगाव सडक येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. बोअरवेल व्यवसायाशी संबंधित कामगारांचे वेतन, वाहनचालकांचा खर्च, यंत्रसामग्रीचे वाढते दर, डिझेल दरवाढ, सुटे भाग तसेच देखभाल खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून बोअरवेल खोदकामाचे दर जैसे थे असल्याने जिल्ह्यातील ४० हून अधिक बोअरवेल व्यावसायिकांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे.
या संदर्भात शासन तसेच संबंधित विभागांकडे वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई अथवा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नसल्याने नाईलाजास्तव असोसिएशनने अनिश्चितकालीन संपाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या संपाच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्रकारची बोअरवेल खोदकामे, दुरुस्ती व संबंधित कामे पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे सुमारे ४० पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.









