महाराष्ट्र सुन्न! विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन
दै. लोकजन विशेष प्रतिनिधी बारामती ः- महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठी हानी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे आज बारामती येथे घडलेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला आले होते. तेव्हा ही भयावह घडना घडली. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले असून, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
अजित पवार खासगीविमानाने बारामतीला येत होते. विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना अचानक नियंत्रण सुटले. धावपट्टीवरून विमान घसरले आणि त्याचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट झाला. या दुघर्टनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. ज्यात काही प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. अपघात इतका भयंकर होता की, विमानाचे अवशेष विखुरले गेले आणि धूर निघत असल्याचे दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय टीमने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, दुदैवाने सहा जणांना वाचवता आले नाही. या अपघाताचे नेमके कारण अद्याप जाहीर झालेेल नाही. परंतु, तज्ज्ञांच्या मतानुसार, हवामानातील अचानक बदल, पायलटचा चुकीचा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक दोष हे यामागील संभाव्य घटक असू शकतात. या अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्यासारखे वाटते. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ही मोठी हानी आहे.अजित पवार हे ६६ वर्षाचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षापासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यमुळे ते चर्चेत राहिले होते.









