पदाचा दुरुपयोग करणारे सरपंच व सदस्य पदमुक्त

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या सुकळी नकुल ग्रामपंचायती मध्ये सत्तेचा गैरवापर आणी प्रशासकीय अनियमितता करणाऱ्या सरपंच व सदस्यांना नागपूर विभागीय आयुक्तांनी अखेर पदमुक्त केले आहे. सरपंचासह ग्रामपंचायतीच्या एकूण सातही सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) अंतर्गत दोषी ठरवीत पदावरून निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

एकाच वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांवर झालेली ही कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तर या प्रकरणाचा खरा शिल्पकारत्याच ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेला ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आंबेडारे ठरला आहे. सदर प्रकरणात ग्रा. पं. कर्मचारी गणेश शंकर आंबेडारे यांनी या सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार गावातील सांडपाण्याच्या मार्गावर बेकायदेशीर बांधकाम करणे, घराच्या नोंदीमध्ये फेरफार करताना नियमांचे उल्लंघन करणे आणि अधिकाराचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे आरोप करण्यात आले होते. विशेष म्हणजे सांडपाण्याची वाहिनी बंद केल्यामुळे अर्जदाराच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी सादर केलेल्या फेरचौकशी अहवालात (दि.१६ जुलै २०२५) स्पष्ट नमूद करण्यात आले की, सरपंच आणि सदस्यांनी आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरूपाचा कसूर केला आहे. मालमत्ता पत्रक नमुना ८ मध्ये बेकायदेशीररीत्या फेरफार करणे आणि मासिक सभेचे नियम धाब्यावर बसवून ठराव मंजूर करणे, हे आरोप सिद्ध झाल्यामुळे अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांचे अवलोकन केले असता सरपंच व सदस्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असून ते पदावर राहण्यास पात्र नसल्याचे निकालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे यात सरपंचच नव्हे तर त्यांचे खंदे समर्थक ६ सदस्य हे सुद्धा तेवढेच या गैरप्रकारातदोषी आहेत. या आदेशान्वये सुकळी नकुल येथील सरपंच प्रमिला नागपुरे, तत्कालीन सरपंच तथा सदस्य गीता आंबेडारे, सदस्य सोहनलाल पारधी, सदस्य सुनिल शिवणे, सदस्य अमरदिप गोंडाणे, सदस्य स्वाती पटेले व अंतकला रहांगडाले या सर्वांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यांना भविष्यात या ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा सदस्य पद धारण करण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे. या धाडसी निर्णयामुळे भ्रष्ट कारभार करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे चांगलेच धाबे दणाणले असून, “कायदा सर्वांसाठी समान आहे’ हा संदेश या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *