भुकेने व्याकूळ वाघाच्या बछड्याचा मृत्यू
दै. लोकजन वुत्तसेवा तुमसर :- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र आलेसुर नियतक्षेत्र खापा मौजा मांडवी या ठिकाणी दि. ११ फेब्रुवारी रोजी बावनथडी कॅनलला लागून असलेल्या शेतामध्ये वन्य प्राणी वाघाचा बछडा मृत अवस्थेत आढळला. सदर बछड्याचा मृत्यू भुकेमुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच वनधिकारी वनकर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर मृत वन्यप्राणी वाघ बछड्याजवळ दुसरा समवयस्कर वाघ बछडा जिवंत अवस्थेत आढळून आला. सदर दोन्ही वाघ (मादी) बछड्यांचे वय २- ३ महिने असून. सदर वेळी मादी त्यांच्या बछड्याजवळ आढळून आली नाही. तदनंतर नाकाडोंगरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.बारापात्रे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील पाटील व सिहोरा पशुधन विकास अधिकारी डॉ. आशिष गटकळ यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. सदर मृत वाघ बछड्याला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार ताब्यात घेण्यात आले.आज शवविच्छेदन करण्यात आले.
सदर वाघाच्या बछड्याचे मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवच्छेदनानंतर ते स्पष्ट होणार आहे. मृत वाघ बछड्याजवळ असलेला जिवंत बछडा अशक्त अवस्थेत असल्याने त्याला सुरक्षितरित्या स्थानिक वन कर्मचारी व शीघ्र बचाव पथक भंडारा च्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील उपचाराकरता वन्यप्राणी उपचार केंद्र, गोरेवाडा येथे हलवण्यात आलेले आहे. या वेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण चे प्रतिनिधी शाहिद खान व प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे प्रतिनिधी म्हणून भंडारा जिल्हा चे मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख उपस्थीत होते. प्रकरणी वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासाची कार्यवाही उपवनसंरक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनात, रितेश भोंगाडे, प्रकाष्ट निष्काशन अधिकारी व निरंजन वैद्य, वनपरिक्षेत्र अधिकारी लेंडेझरी हे करीत आहेत.