आ. नरेंद्र भोंडेकरांच्या नेतृत्वात अड्याळ पोलीस ठाण्यावर हल्लाबोल

दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- पवनी तालुक्यातील भावड येथील शिव मंदिरात महादेवाची मूर्ती तिसऱ्यांदा फोडण्याची अत्यंत निंदनीय घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आज भावड ते अड्याळ पोलिस स्टेशन असा मोर्चा काढण्यात आला. दोषी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात आली नाही तर पुढील टप्प्यात भावड ते भंडारा असा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आ. नरेंद्र भोंडेकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला.

दि. १७ जानेवारी रोजी सकाळी भाविक दर्शनासाठीमंदिरात गेले असता भगवान शंकराच्या मूर्तीचा चेहरा व दोन्ही हात पूर्णतः विद्रूप करण्यात आल्याचे लक्षात आले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात धाव घेतली. तिसऱ्यांदा हा घृणास्पद प्रकार घडल्याने नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते. भावड शिवमंदीरातीलमहादेवाची मुर्ती फोडण्यात आल्याचे माहित होताच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भावड गाठले. लगेच परिसरातील हजारो हिंदू बांधव घटनास्थळी दाखल झाले व स्वयंस्फूर्तपणे रस्ता रोकोआंदोलन करण्यात आले.

अनेक नेत्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासनाला २४ तासाचा अल्टीमेटम देवून आरोपीला अटक न केल्यास आज दि. १८ जानेवारी रोजी भावडपासून अड्याळ पोलिस स्टेशनपर्यंत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. आज आरोपीला अटककरण्यात न आल्याने भावड ते अड्याळ पोलीस स्टेशन असा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आरोपीला अटक करा, हिंदू समाजावरील अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्च्यात आ. नरेंद्र भोंडेकर यांच्यासह मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रमोद मेंढे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, पवनी तालुका प्रमुख प्रशांत भूते, आजाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, माजी जि. प. सदस्य देवेंद्र हजारे, आशिष माटे, राजेंद्र ब्राह्मणकर, उपसभापती प्रमोद मेंढे, जितेश लिचडे, नेताजी नागरिकर, नाना उपरीकर यांच्यासह परिसरातील शेकडो लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *