खड्ड्यात पडलेल्या काळविटच्या पिल्लांसाठी धावून आले तुमसरचे अधिवक्ता स्वामी
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- निसर्ग आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील खापा मांगली शिवारात एका खोल खड्ड्यात पडलेल्या काळवीटाची तुमसर येथिल ॲडव्होकेट विवेक स्वामी यांनी सुरक्षित सुटका करून त्याला जीवनदान दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खापा -मांगली शिवार परिसरातून जात असताना ॲड. विवेक स्वामी यांना एका खड्ड्यात काळवीट पडले असल्याचे दिसून आले. हे काळवीट खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते,
मात्र खड्डा खोल असल्याने त्याला बाहेर येणे अशक्य झाले होते. काळवीट पूर्णपणे भयभीत झाले होते. आणि जास्त वेळ तिथे राहिल्यास त्याच्या जीवालाईतर हिंस्त्र प्राण्यांपासुन धोका निर्माण होऊ शकला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ॲड. स्वामी यांनी विलंब न लावता स्थानिक नागरिकांच्या मदतीने काळवीटाची सुरक्षितपणे खड्ड्यातून सुटका केली.
काळवीट जखमी होऊ नये याची पूर्ण काळजी घेत त्यांनी त्याला बाहेर काढले. केवळ सुटका करून न थांबता, त्यांनी तत्काळ तुमसर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाल्यावर, ॲड. स्वामी यांनी त्या काळवीटाला वनविभागाच्या स्वाधीन केले. वन अधिकाऱ्यांनी काळवीटाची प्राथमिक तपासणी केली. वेळीच माहिती मिळाल्याने आणि सुटका झाल्याने काळवीटाचे पिल्लू सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. या धाडसी आणि कौतुकास्पद कार्याबद्दल वनविभागाने आणि परिसरातील नागरिकांनी ॲड. विवेक स्वामी, शुभम देशमुख व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.









