जिल्ह्यातील चारहीनगरपरिषदांमध्ये भाजपाचे उपाध्यक्ष
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांसाठी त्या त्या नगरपरिषदेत नगराध्यक्ष व न. प. मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत आज दि. १६ जून रोजी प्रथम सभा आयोजित करण्यात आली होती. चारही नगरपरिषदेत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निवडून आले आहेत. त्यानंतर स्विकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पडली.
निवडून आलेले उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले. भंडारा नगरपरिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे उपाध्यक्षही भाजपाचाच होईल, हे स्पष्ट होते. उपाध्यक्षपदी भाजपाच्या चंद्रकला प्रेमलाल भोपे यांची निवड करण्यात आली तर स्विकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष सचिन कुंभलकर, चैतन्य उमाळकर, ॲड. कैलास भुरे यांची निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनयमोहन पशिने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित उपाध्यक्ष व स्विकृत सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
पवनीत भाजपचे सोनू बावनकर उपाध्यक्ष
पवनी :- पवनी न.प.चे उपाध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्यांसाठी मुख्याधिकारी नीलेश इंगोले आणि नगराध्यक्ष विजया नंदूरकर यांच्या उपस्थितीत मतदान झाले. सोनू शामराव बावनकर (भाजप) यांना एकूण १७ मते मिळाली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे प्रतिस्पर्धी नामदेव किसन सुरकर (शिवसेना -शिंदे गट) यांना फक्त ५ मते मिळाली. मतदान हात उंचावून घेण्यात आले.स्वीकृत सदस्यसाठी भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे भावना भाजीपाले यांची बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे, शिवसेना-शिंदे गटातील देवराज बावनकर आणि राष्ट्रवादी (अ. प.) गटातील लीलाधर मुंडले यांच्यात ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. ज्यामध्ये देवराज बावनकर यांचे नाव काढण्यात आले आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
साकोलीत अपक्ष रोहिणी मुंगुलमारे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ
साकोली ः- साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अपक्ष उमेदवार रोहिणी मुंगुलमारे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपाध्यक्ष बनविण्यात आले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसच्या गटातून ॲड. दिलीप कातोरे यांची तर भाजपाचे वतीने नितीन खेडीकर यांची स्विकृत सदस्य म्हणून वर्णी लागली. स्वीकृत सदस्याकरिता काँग्रेसच्या गटामध्ये रस्सीखेच होती परंतु पक्षश्रेष्ठीकडून ॲड. दिलीप कातोरे यांचे नाव आज ऐन वेळेवर घोषित. केले त्यामुळे काँग्रेसचे स्वीकृत सदस्याचे दावेदार हिरमुसले होते.
तुमसर नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपाचे सचिन बोपचे
तुमसर ः- नगर परिषदेत उपाध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे सचिन बोपचे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली, पण त्याचवेळी नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा आधार घेत तीन स्वीकृत सदस्यांची स्वमर्जीने नियुक्ती करत नगर परिषदेत खळबळ उडवून दिली आहे. यात प्रमोद तितीरमारे, शैलेश मेश्राम, मोंटू चोपकर असे निवड झालेल्या सदस्यांचे नावे आहेत. स्वीकृत सदस्य निवडीत गटनेत्यांनी अधिकृतपणे दिलेल्या नावांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. नगराध्यक्षांनी कोणताही सल्लामसलत न करता थेट निर्णय घेतल्याने, हा प्रकार सत्तेचा माज आहे की नियोजनबद्ध कट? असा सवाल उपस्थित होत आहे.









