लाडक्या बहिणीचे पैसे न मिळाल्याने अचानक महिला रस्त्यावर उतरल्या
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरूनही व केवायसी करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने अचानक महिला नागपूर नाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर उतरल्या. त्यामुळे काही वेळ वाहतुक ठप्प पडली होती. शिंदे सरकारने लाडकी बहिणी योजना लागू केली. त्यानंतर अनेकांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. केवायसी करून ऑनलाईन अर्जात नोकरी दाखवित असल्याने अनेक महिला भंडारा येथील महिला व बालकल्याण विभागात चकरा मारीत होत्या.
आज अचानक या महिलांनी नागपूर नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता बंद पाडला. त्यामुळे धांदल माजली. भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसारी, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी ताफ्यासह घटनास्थळी गाठले. पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी महिलांना समजावून सांगत प्रथम रस्ता खुला करून महिलांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी यांचेसोबत चर्चा करण्यास पाठविले.









