साकोली नगरपरिषदेतील सत्तासमीकरण निर्णायक टप्प्यावर!

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, १६ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदाची व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. सत्तासमीकरण, इच्छुकांची मोर्चेबांधणी, पक्षांतर्गत हालचाली आणि वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या गुप्त रणनीती यामुळे आजची सभा केवळ औपचारिक न राहता राजकीय थराराची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते यांच्यासह भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसचे सात नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आणि तीन अपक्ष असे प्रारंभीचे संख्याबळ होते. मात्र अपक्ष नगरसेविका रोहिणी मुंगूलमारे व सपन शरद कापगते यांनी भाजपाला पाठिंबा देत पक्षात प्रवेश केला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नयन पटेल यांनी भाजपाला समर्थन दिल्याने भाजपाचे संख्याबळ थेट ११ वर पोहोचले आहे.

या भक्कम संख्याबळामुळे उपाध्यक्षपदावर भाजपाचाच शिक्का बसणार, हे जवळपास निश्चित मानले जाते. भाजपाकडून उपाध्यक्ष पदासाठी रोहिणी मुंगूलमारे, राजू पोगडे आणि पंकज मुंगूलमारे हीतीन नावे चर्चेत असून यापैकी कोणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत कमालीचा सस्पेन्स कायम आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाकडून आनीक निंबेकर, नितीन खेडीकर, अमोल हलमारे, रमेश मुंगूलमारे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून पत्रकार संतोष कोरे, अश्विन नशिने,अशोक कापगते, हेमलता भेंडारकर, एड. आनंद नंदागवळी, नासिर अली तसेच एड. दिलीप कातोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे.

एडवोकेट दिलीप कातोरे हे २०१६ च्या नगरपालिका कार्यकाळात स्वीकृत सदस्य म्हणून पाच वर्ष नगरपरिषदेत होते हे विशेष. दोन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत आपले पत्ते शेवटच्या क्षणापर्यंत बंद ठेवले असून कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचे, यावरून पक्षांतर्गत राजकारण तापले आहे. आजच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होताच साकोलीच्या स्थानिक राजकारणाचे नवे चित्र स्पष्ट होणार असून, या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *