पूर्व विदर्भाची काशी “दुर्गाबाई डोह’ येथे श्रद्धेचा महासागर उसळला

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पूर्व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुभंली येथील दुर्गाबाई डोह तीर्थक्षेत्रावर यंदा अभूतपूर्व श्रद्धा आणि उत्साहाचे दर्शन घडले. विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. नवसपूर्ती, नवस मागणी, विधिवत पूजा-अर्चा, स्नान आणि पारंपरिक देवीचे पोहे काढणे या परंपरांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण संस्कृती यांचा संगम साधणारी ही यात्रा आधुनिक युगातही आपला वारसा जपताना दिसून आली.

दुर्गाबाई डोह येथे भाविकांनी पहाटेपासून चुलबंद नदीत स्नान करून देवीची श्रद्धेने पूजा केली.पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पाळल्या जात असल्याचे या यात्रेत प्रकर्षाने जाणवले. नवस फेडण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविकांनी देवीसमोर लीन होऊन प्रार्थना केली. श्रद्धेच्या ओघात वय, जात, भाषा, प्रांत यांची सर्व बंधने गळून पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या पवित्र यात्रेत क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित राहून दुर्गाबाई देवीचे विधिवत पूजन व दर्शन घेतले.त्यांच्या मित्रपरिवारातर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय शिबिर राबवून आरोग्य सुविधा देण्यात आल्या, तसेच अंधश्रद्धा निमर्ूलनाच्या शिबिरातून जनजागृती करण्यात आली. त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक न राहता सामाजिक प्रबोधनाचेही प्रभावी माध्यम ठरत आहे. यात्रेच्या निमित्ताने उभारलेल्या बाजारपेठेत ग्रामीण संस्कृतीचे जिवंत दर्शन घडले. दगडी पाटा-वरोटा, खलबत्ता, शेतीची अवजारे, घरगुती वस्तू, हस्तकला साहित्य, सौंदर्यप्रसाधने यांची रेलचेल होती.

बच्चे कंपनीसाठी आकाश पाळणे, खेळणी, तरुणांसाठी टॅटू गोंदवण्याची आधुनिक प्रथा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. पूर्वी प्रसिद्ध असलेला घोडा बाजार काळाच्या ओघात अस्तास गेला असला, तरी तीन दिवसांत होणारी लाखो रुपयांची उलाढाल स्थानिक अर्थकारणाला मोठा आधार देणारी ठरत आहे. यात्रेच्या सुरक्षित आणि सुरळीत आयोजनासाठी प्रशासन सज्ज होते. साकोली आगाराकडून अतिरिक्त बससेवा, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वैद्यकीय पथके, अग्निशमन व आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या. गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. श्रद्धा आणि सुरक्षितता यांचा समतोल राखत, कुभंलीची दुर्गाबाई डोह यात्रा यंदाही पूर्व विदर्भातील एक भव्य, भावनात्मक आणि अविस्मरणीय धार्मिक महोत्सव ठरत जो आधुनिक युगातही ग्रामीण संस्कृतीचा गौरवशाली वारसा जपत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *