रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आंदोलनाचा इशारा

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत असलेल्या सिलेगाव-रेंगेपार रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा खरमरित इशारा पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती तथा सदस्य हिरालाल नागपुरे यांनी चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राजू ढबाले यांना एका निवेदना अन्वये दिला आहे. पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणारा सिलेगावरेंगेपार ग्रामीण मार्ग क्र.१७० हा रस्ता आज मृत्यूचा मार्ग ठरला आहे. वाहनांसाठी धोकादायक असलेल्या या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षहोत असल्याचा आरोप हिरालाल नागपुरे यांनी केला आहे.

या रस्त्याने दररोज शेकडो ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व महिला आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात या रस्त्याचे चिखल तळ्यात रूपांतर होत आहे. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. रस्त्याची अवस्था पाहता अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे ग्रामस्थ संतापव्यक्त करीत आहेत. अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या परंतु शासन याकडे दुर्लक्ष करून आहे.

सिलेगाव-रेंगेपार रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढबाले यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले त्यावेळी शिष्टमंडळात माजी उपसभापती हिराला नागपूरे, माजी सभापती कलाम शेख, माजी पंचायत समिती सदस्य बंटी बानेवार, माजी सरपंच उमेश कटरे, माजी सरपंच गजानन लांजेवार, माजी सरपंच गळीराम बांडेबुचे, माणिकराव ठाकरे व माजी उपसरपंच सुखशाम येळे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *