तुमसरात सत्ता दोरीवर! उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने
राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन) ः- तुमसर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून अपक्ष उमेदवार सागर गभने यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र अध्यक्षपद अपक्षाकडे असले तरी उपाध्यक्ष पद व स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून नगरपरिषदेत सत्तासंघर्ष चांगलाच पेटला असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) आमने-सामने उभे ठाकले आहेत. परिणामी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. २५ सदस्यीय तुमसर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अप) व भाजपचे प्रत्येकी १०-१० नगरसेवक निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे ३, शिवसेना (शिंदे गट)चा १ व १ अपक्ष सदस्य आहे.
उपाध्यक्ष पदासाठी १३ सदस्यांचा जादुईआकडा आवश्यक असल्याने कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. नगर उपाध्यक्षांकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे अधिकार असल्यामुळे या पदाला विशेष राजकीय वजन प्राप्त झालेआहे. त्यामुळे उपाध्यक्ष बनविण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, यासाठी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) व अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे सदस्य ज्या बाजूने जातील, त्याच बाजूचा उमेदवार उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून नागपूर येथे तरराष्ट्रवादी काँग्रेस (अप)कडून गोंदिया येथे लॉबींग सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार राजू कारेमोरे, तर भाजपकडून आमदार डॉ. परिणय फुके यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.









