पिटेझरीमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पिटेझरीत सागवानाची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार वन्यजीव विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर चौकशी समिती नेमून अहवाल नागझिऱ्याचे उपसंचालक यांच्याकडे देण्यात आला. परंतु, चौकशीचा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच आरोप तक्रारदारांनी केला. शिवाय थातूरमातूर चौकशी करून प्रकरण दडपल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. नागझिरा वन्यजीव विभागाच्या पिटेझरी येथील सुमारे ५० सागवानाची अवैध कत्तल केल्याची तक्रार २५ सप्टेंबरला करण्यात आली. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रारदारांना चौकशीसाठी साकोली येथील कार्यालयात बोलावण्यात आले.

अवैध वृक्षतोड पिटेझरीत झाली असताना चौकशी कार्यालयात कागदोपत्री करण्यात आली. ही चौकशी सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. त्यांनी चौकशीचा अहवाल नागझिरा वन्यजीव विभागाचे उपसंचालक प्रितम कोडापे यांच्याकडे दिला. यासंदर्भात साकोलीकार्यालयात भेट देण्यात आली. शिवाय मेलवरून चौकशीचा अहवाल मागविण्यात आला. परंतु, हा अहवाल देण्यास वन्यजीव विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. अहवाल लवकरच देतो, असे सांगून महिन्याभरापासून चालढकल केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची नागपूर वन्यजीव विभागाकडून विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *