राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती १३० जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) युतीची घोषणा केली. या दोघांनी वरळीतील एका हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होणार आणि तो आमचाच असेल, असे ठणकावून सांगितले. मात्र, या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी मुंबई किंवा अन्य महानगरपालिकांच्या जागावाटपाचे सूत्र जाहीर केले नाही. परंतु, या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले.

त्यांनी शिवसेना-मनसेला किती जागांवर विजय मिळू शकतात, याबाबताच अंदाज वर्तवला. तसेच आपल्याला या निवडणुकीत उमेदवारी मिळेल,असा विश्वासही व्यक्त केला. मी १०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना-मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार ठरु शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९९ मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. परंतु, यंदा ठाकरे गटाने ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचेही सांगितले जात होते.

मात्र, राज-उद्धव यांच्या युतीच्या घोषणेपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी आपले तिकीट फिक्स असल्याचा दावा केला. मी स्वत: रणंगणात असेन. ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १३० पेक्षा अधिक जागा जिंकतील, असा दावाही किशोरी पेडणेकर यांनी केला. भाजपवाले आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी आमच्यावर कधी आरोप केले नाहीत. आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही काय काम केलं. हे मुंबईकरांना माहिती आहे. असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *