ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार २६ तारखेला घोषणा करणार !
मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या बदल्या भूमिका पाहायला मिळत आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी, उद्याच दुपारी १२ वाजता अधिकृतपणे ठाकरे बंधूंच्या म्हणजेच मनसे-शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. त्यानंतर, आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईतसाठी ठाकरे तर पुण्यासाठी पवार एकत्र आल्याचं महापालिका निवडणुकांमुळे पाहायला मिळालं. ठाकरेंनंतर पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून २६ डिसेंबर रोजी याची घोषणा होणार असल्याची माहिती स्वत: अजित पवारांनी दिली.
अजित पवार २६ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत, कार्यकर्त्यांना बोलताना अजित पवारांनी २६ तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, २६ तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण काय बोलतं यावर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले. यासंदर्भाने उद्या अजित पवार मुंबईत आढावा घेणार आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसाफरक पडलेला दिसत नाही.









