मोहाडीच्या जुन्या बसस्थानक चौकात धोकादायक खड्डा, अपघाताचा धोका वाढला

मोहाडी:- मोहाडी नगरातील जुन्या बसस्थानकजवळील प्रमुख चौकात मोठा व खोल खड्डा पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरत आहे. सदर चौक हा शहरातील वदर्ळीचा भाग असून, दिवसभरात शेकडो वाहने या मार्गावरून जातात. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या या खड्याकडे बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. नगरपंचायत प्रशासनही याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.

रात्रीच्या वेळी तसेच वेगाने येणाऱ्या वाहनांना हा खड्डा दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात होत आहेत. आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार या खड्यात पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळा झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. केवळ तात्पुरती माती टाकून बुजवणूक न करता, कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बांधकाम विभाग व नगरपंचायत प्रशासनाने तातडीने या खड्ड्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *